डीएम रिपोर्ट्स- औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात रोही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून सदर प्रकार औंढा नागनाथचे वन अधिकारी माधव केंद्रे यांच्या निदर्शनास आणून देताच, त्यांनी तात्काळ कारवाई केली.
पिंपळदरी भागातील राजदरी शिवारात गंभीर अवस्थेत एक रोही पडलेला असल्याचे दिसून आल्यावर सोशल मीडियावर त्याचे फोटो झळकले होते. याबाबत औंढा नागनाथचे वन अधिकारी माधव केंद्रे यांना 'डेमोक्रॅट महाराष्ट्रा'च्या वतीने माहिती देण्यात आली. तयार केंद्रे यांनी तात्काळ राजदरी गावाच्या सरपंचांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. जखमी रोहीची शोधाशोध केली असता, त्याठिकाणी तो आढळला नाही. चौकशीअंती शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले, की भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सदर रोही जखमी झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. थोड्या वेळाने अवसान आल्यावर सदर प्राणी जंगलात निघून गेला. त्याभागातील शेतकऱ्यांमुळे जखमी प्राण्याचे प्राण वाचले आहेत. तर वन विभागानेही तात्काळ दाखल घेतल्याने प्रकरणाची शहानिशा झाली असून प्राणिमित्रांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.