डीएम रिपोर्ट्स- गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमेवर लडाख भागात चालू असलेल्या तनावानंतर सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या गोळीबारात भारताचे कर्नल आणि २ जवान शहीद झाले आहेत. या घटनेत चीनचे किती सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही १९६७ नंतर चीन सोबत झालेल्या या गोळीबारात प्रथमच भारताचे सैनिक शहीद झाले असून या घटनेनंतर दोन्ही देशांनी तात्काळ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५३ वर्षांनंतर झालेल्या या पहिल्याच गोळीबारात भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याबाबत भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या १५ दिवसांपासून दोन्ही देशांच्या सीमेवर चालू असलेला तणाव लक्षात घेता दोन्ही लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही बाजूने सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर दोन्ही जवान आपसात भिडल्याचे बोलले जात असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख आणि नौदल प्रमुख यांच्यात या घटनेनंतर महत्वाची बैठक झाली आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार या चकमकीत चीनचे जवान सुद्धा ठार झाले आहेत. परंतु याबाबत भारतीय लष्कराच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आली नाही.