आमदार मुटकुळे यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन
डीएम रिपोर्ट्स- जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या २ जुलै पूर्वी मान्य न केल्यास आशा वर्कर कृती समिती तीन जुलै पासून राज्य व्यापी संपावर जाण्याचा इशारा आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने बुधवारी आमदार तानाजी मुटकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
आशा वर्कर कृती समितीचे अध्यक्ष मुगाजी बुरुड ,जिल्हाध्यक्ष सुधाकर वाढवे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आमदार तानाजी मुटकुळे यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन देऊन कैफियत मांडली. यावेळीसंघटनेच्या अनुराधा महाजन, सुधा सपकाळ,अश्विनी काशीदे, सुमित्रा शिखरे, सविता इंगळे, आदींची उपस्थिती होती.
आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, राष्ट्रीय अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये आशा वर्कर यांना १८ हजार ते २१ हजार रुपयांचे मानधन लागू करावे, प्रवासी भत्ता, आरोग्य किट देण्यात यावे, कोरोना काळात अहोरात्र योद्धा म्हणून काम करणाऱ्या शहरी भागातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना तात्काळ कामाचा मोबदला दयावा, तसेच शासकीय निवस्थान दयावे, सावित्रीबाई फुले मंडळा मार्फत कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण दयावे, डीआरडी योजनेतून लाभार्थ्यांना राशन कार्ड दयावे अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे. २ जुलै पूर्वी मागण्या मान्य न केल्यास तीन जुलै पासून जिल्ह्यातील आशा वर्कर कामबंद आंदोलन करून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.