डीएम रिपोर्ट्स/मुंबई- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात भीम आर्मी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव वर्षाताई मस्के-कांबळे यांनी त्यांच्या राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला.
आज बांद्रा येथील डॉ. रामदास आठवले यांच्या संविधान निवासस्थानी वर्षाताई मस्के-कांबळे यांनी मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन रिपाइं मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव, अंकुश हिवाळे, आशाताई मोरे, सुनंदा मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. वर्षाताई मस्के-कांबळे या भीम आर्मी या संघटनेत राज्य सचिव पदावर काम करीत होत्या. आक्रमक आणि अभ्यासू तरुण महिला नेतृत्व म्हणून त्या लोकप्रिय आहेत. त्यांचे मुंबई, ठाणे, बीड, अहमदनगर, औरंगाबाद येथे स्वतःचे संघटन आणि समर्थक आहेत. त्या मृण्मयी फाउंडेशनच्या अध्यक्षा असून या फाउंडेशनद्वारे औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू आहे. मुंबईत अनेक ठिकाणी त्या सामाजिक उपक्रम राबवित असतात. मुंबईत अनेक झुंझार महिलांचे संघटन त्यांच्या सोबत आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या झुंझार लढाऊ नेत्या म्हणून वर्षाताई मस्के-कांबळे यांचा राजकीय अनुभव पाहता त्यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइं महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ऍड. आशाताई लांडगे यांनी जाहीर केले. वर्षाताई मस्के कांबळे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला बद्दल रिपाइंच्या वतीने अनेक मान्यवरांनी वर्षाताई मस्के-कांबळे यांचे रिपाइं मध्ये स्वागत केले आहे. याबाबत रिपाइंचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.