खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीत ९ सदस्यांची नियुक्ती
डीएम रिपोर्ट्स- हिंगोली जिल्हा विकास सनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची स्थापना खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी शिफारस केल्यानुसार ९ सदस्यांचे नामनिर्देशन केले असून खासदार हेमंत पाटील यांनी सर्व नियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे निवड झालेले बहुसंख्या सदस्य हे शिवसेनेत काम करणारे किंवा शिवसेनेची संबंधित आहेत.
![]() |
खासदार हेमंत पाटील |
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने जिल्हा विकास व सनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची स्थापना जिल्हा स्तरावर करण्यात येत असते, दिशा समितीचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्यक्ष जनतेमधून निवडून आलेले संसद सदस्य ( खासदार ) राज्य विधिमंडळ सदस्य ( आमदार ) व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणे त्याकरिता जिल्ह्यातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध प्रवर्गातुन सन्मानीय सदस्यांची निवड केली जाते. जिल्ह्याचे खासदार या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानुसार हिंगोली जिल्हा दिशा समितीचेअध्यक्ष म्हणून खासदार हेमंत पाटील आहेत. तर जिल्हाधिकारी सचिव म्हणून काम पाहत असतात. खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची निवड करून नियुक्ती करण्यात येते. अध्यक्षांना त्यांच्या अधिकारतून सदस्यांच्या नावांची शिफारस करता येते.
त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून खोब्राजी नरवाडे, इंदिराबाई राठोड, दिलीप कंदुर्गे, माणिकराव झटे, सखुबाई गांजवे, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून अनुक्रमे गोविंद मुळे, संतोष शेळके, महिला प्रवर्गातून सुनिता मुळे तर संस्था प्रतिनिधी म्हणून शिवाजी गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचे खासदार हेमंत पाटील यांनी अभिनंदन केले. लवकरच सर्व सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सदस्यांचे जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात आगामी काळात मोलाचे सहकार्य राहणार असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन जिल्ह्याच्या विकासाचे ते शिलेदार व्हावेत अशी अपेक्षा खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
एकदा निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा कोणत्याही पक्षाचा न राहता, सर्व मतदारांचा असतो. असे असतानाही हे लोकप्रतिनिधी कोणत्याही समित्या असोत की, त्यांच्या विकास निधीतील कामे देताना त्यांच्या पक्षातील लोकांचा प्राधान्य देत असतात. त्यातून कार्यकर्ता साम-दामने दणकट करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे या दिशा समितीत निवडलेल्या बहुतांश लोकांमध्येही शिवसेना पक्षात काम करणाऱ्या किंवा शिवसेनेशी संबंधित असलेल्यांचाच समावेश आहे.