आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज- भाग १

Democrat MAHARASHTRA


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तीन भागांमध्ये मातंग समाजाचे आंबेडकरी चळवळीतील योगदान या विषयावर लेखमालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे.
                      (फोटो- गुगल इंडिया कडून साभार )

पश्चिम महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने मातंग समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला जनाधार प्राप्त करून दिलेला होता कारण कोल्हापूर परिसरात मातंग समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज हे जाणता राजा असल्याने येथील अस्पृश्यांना विषमता ,अस्पृश्यता, अन्याय व अत्याचाराचे चटके उर्वरित महाराष्ट्रातील अस्पृश्यांना फारसे बसले नाहीत.
शाहूमहाराजांनी मांग,महार, चर्मकार समाजातील शिक्षित तरुणांना वकिलीच्या सनदा प्रदान केल्या त्याचबरोबर सर्व क्षेत्रात विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यात मातंग समाजातील तुकाराम गणेशाचार्य यांना वकिलीची सनद मिळाल्याने मातंग समाजात उत्साह संचारला. त्यानंतरच्या काळात अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळाल्याने चळवळीला स्फुरण चढले. विशेष म्हणजे बहुजन मानवमुक्तीच्या चळवळीत सक्रिय सहभागी झाले .त्यात तुकाराम गणेशाचार्य  यांचा प्राधान्याने समावेश होतो.
तुकाराम गणेशाचार्य हे कोल्हापुरात वकिली करीत असताना दत्तोबा पवारांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सान्निध्यात आले.
विशेषतः बाबासाहेबांच्या निपाणी येथील सभेनंतर गणेशाचार्य व बाबासाहेबांत वारंवार भेटी होऊ लागल्या व त्यातूनच हे दोघे अत्यंत जवळचे मित्र झाले. बाबासाहेबांनी गणेशाचार्य यांची आपल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या ट्रस्टी मंडळावर नेमणूक केली.
बाबासाहेबांच्या सर्व उपक्रमात गणेशाचार्य उत्साहाने भाग घेऊ लागले. विशेषतः ऍड. दत्तोबा पवार ,ऍड.तुकाराम गणेशाचार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तिघे मुंबई ,कोल्हापूर येथे नेहमी एकत्र येत व स्नेहभोजन घेत असत.
या तिघांचे नाते एवढे भक्कम होते की ते एकमेकांना महार, मांग, चांभार अशा नावाने संबोधून चेष्टा करीत असत.
त्यानंतरच्या काळात दत्तोबा पवार तुकाराम गणेशाचार्य हे डॉक्टर बाबासाहेबांच्या रचनात्मक आणि संघर्षात्मक चळवळीत  सातत्याने सहभागी झालेले दिसतात अनेक सुख दुःखाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांनी तुकाराम
गणेशाचार्यांना मदत केलेली दिसून येते. गणेशाचार्य आजारी असताना डॉ.बाबासाहेबांनी मिरजेला जाऊन त्यांची भेट घेतली व धीर दिला त्यावेळी त्यांचे वाढलेले केस पाहून डॉ. बाबासाहेबांनी नाहव्याकडून त्यांची पूर्ण हजामत करवुन घेतली.
अशा रीतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे सहकारी म्हणून गणेशाचार्य यांचा उल्लेख करावा लागेल. मात्र कार्यकर्त्यांपेक्षा गणेशाचार्य व बाबासाहेब यांच्या मैत्रीची वीण अधिक घट्ट होते असे म्हणावे लागेल.
सर्वसाधारणपणे 1920 ते 1945 या काळात तुकाराम गणेशाचार्य यांचा डॉ. बाबासाहेबांची अत्यंत घनिष्ठ संबंध आला. राजर्षी शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्योद्धाराचे काम करताना माणगावच्या परिषदेनंतर कोल्हापूर, बेळगाव ,निपाणी, सातारा या भागांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व लोकमान्य करण्यात व अस्पृश्य परिषदांचे आयोजन करून डॉ.बाबासाहेबांचे मार्गदर्शन घडवून आणण्यात त्यांचा  सिंहाचा वाटा होता.
कारण गणेशाचार्य हे त्या काळातील राजमान्य असे लोकप्रिय व्यक्तिमत्व होते कोल्हापूर नगरपालिकेचे 1920 साली ते लोकनियुक्त सभासद होते त्यामुळे त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता.
निपाणी ,बेळगाव या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  उदयाच्या आधीपासून सामाजिक चळवळीला डॉ. बाबासाहेबांना जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या काळात गणेशाचार्यांनी व अन्य मंडळींनी केला .
त्यासाठी 1925 साली बेळगाव येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत वर्ग परिषदेचे आयोजन केले.डॉ. बाबासाहेबांना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना घडवून आणले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांनी सर्व दलितांनी एकजुटीने राहण्याचे आवाहनही केले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर भागात जेव्हा-जेव्हा येत तेव्हा तेव्हा त्यांचे जिव्हाळ्याचे मित्र गणेशाचार्य यांना सर्व नियोजनाची जबाबदारी देत असत.
राजर्षी शाहू महाराजांचे खास मंडळीपैकी असलेल्या लोकांच्या त्यांनी विशेष पदावर नेमणुका केल्या होत्या गणेशाचार्य यांना पोलीस प्रोसिक्युटर म्हणून नेमले होते. डॉ.बाबासाहेब विश्रांतीसाठी एकदा पन्हाळा येथे आले असता पन्हाळ्यावर त्या काळात वेगवेगळे पदाधिकारी येत. डॉ. बाबासाहेब यांचे खास मित्र असलेले दत्तोबा पवार ,गंगाधर पोळ ,डॉ.रमाकांत कांबळे , तुकाराम गणेशाचार्य ही सर्व डॉ. बाबासाहेबांबरोबर सहल, बैठका, चर्चा यात  सातत्याने सहभागी होत असत.
डॉ.बाबासाहेब एकदा एक महिन्यासाठी पन्हाळा येथे हवापालटासाठी थांबले असताना तुकाराम गणेशाचार्य कायम त्यांच्या सोबत होते. बाबासाहेबांवर त्यांची अढळ निष्ठा आणि प्रेम होते बाबासाहेबांसाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी असे. डॉ.बाबासाहेब  कोल्हापूर शहरात फिरत असताना जर शेंगा मक्याची कणसे दिसली तर गणेशाचार्य तत्परतेने कणसे ,शेंगा वाल्याकडे जात आणि आपल्या शर्टात शेंगा कणसे घेत, भाजलेल्या शेंगांच्या कणसांच्या राखेने शर्ट खराब होत असे पण गणेशाचार्यांना त्याची पर्वा नसे अशी आठवण गणेशाचार्यांचे मित्र बी. एच. वराळे यांनी लिहून ठेवली आहे.
1937 साली डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतिक विभागाच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय झाला त्यावेळी गणेशाचार्य व अन्य  मंडळींनी मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दौरे काढले तसेच निपाणी या परिसरात गणेशाचार्य यांचे नातेवाईक आणि मित्र  मंडळी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे वराळे निवडून येऊ शकले.
त्याचबरोबर गणेशाचार्य यांनी पुढाकार घेऊन 30 नोव्हेंबर 1938 रोजी निपाणी नगर परिषदेकडून डॉ. बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले.
त्यावेळी बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेले अनेक तरुण पुढील काळात बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून पुढे आहे. त्याच्याबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अस्पृश्य परिषदांचे आयोजन करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालविला होता.
त्या आवाहनास प्रतिसाद देत गणेशाचार्य, पवार यांनी पुढाकार घेत 1938 रोजी गडहिंग्लज व 1944 साली करवीर येथे अस्पृश्य वर्ग परिषदांचे आयोजन केले तसेच 1936 साली कोल्हापूर येथे खासबाग मैदानात दलित प्रजा परिषद आयोजित केली.
यासर्व परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला.
डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाने दलितवर्गीय जनता प्रभावित झाली होती. यामागे गणेशाचार्यासारख्या अनेकांचे योगदान आहे हे विसरता येणार नाही.
( डॉ *.सोमनाथ कदम*
यांच्या 'आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज,या लोकवाङमयगॣह मुंबई यांजकडून नुकत्याच प्रकाशित झालेल्या बहुचर्चित ग्रंथातून साभार.
संपर्क..७७०९२९१३८२)

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने