पत्रकार खंडेलवाल मारहाण प्रकरणी गुन्हा नाहीच
Democrat MAHARASHTRA
News Bureau/HINGOLI- येथील न्यूज १८- लोकमत या वृत्तवाहिनीचे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कथित मारहाणप्रकरणी हिंगोली पोलिसांनी चार दिवसानंतर ही गुन्हा दाखल केला नाही. तर विशेष पोलीस महानिरीक्षक...... लोहिया यांनी कन्हैया खंडेलवाल यांच्या वरील हल्ल्याला ॲक्शन टेकन इन गुड फेथ"- म्हणजेच सद्भावपूर्वक केलेले कृत्य असे नाव देवून एक प्रकारे पोलिसांनी केलेल्या अमानुष कृत्याचे समर्थनच केले आहे. त्यामुळे खंडेलवाल यांच्यावरील हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आता मावळली आहे.
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया हे रविवारी हिंगोलीत आले होते. पत्रकार नंदू तोष्निवाल, प्रद्युम्न गिरीकर, प्रकाश इंगोले यांनी लोहिया यांची भेट घेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना लोहिया यांनी सांगितले, पोलिसांनी त्यांच्या कायदीय सल्लागाराचा याबाबत सल्ला मागविला आहे. त्यानुसार, पत्रकाराला झालेली मारहाण ही "ॲक्शन टेकन इन गुड फेथ" या सदराखाली येत आहे. परिणामी या प्रकरणात आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही, असे लोहिया यांनी स्पष्ट सांगितले. तसेच याबाबत न्यायालयात जावून दाद मागण्याचा सल्लाही लोहिया यांनी दिला असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोषणीवाल यांनी दिली. एक दोन लाठ्या नाही तर शेकडो लाठया मारणे, गुप्तांगावर लाथा मारणे, कानशिलात पिस्तूल लावणे आणि हा सर्व प्रकार सार्वजनिक ठिकाणी नाही तर वाहतूक शाखेच्या बंद खोलीत करणे. या अमानुष मारहाणीला "ॲक्शन टेकन इन गुड फेथ"- म्हणजेच सद्भावपूर्वक केलेले कृत्य असे नाव देण्यात आल्याने आयजीकडून मारहाणीचे एक प्रकारे समर्थनच करण्यात आले आहे. चिंचोलकर यांना झालेल्या कथित मारहाणीबाबत मात्र पोलिसांनी तात्काळ गंभीर दखल घेत खंडेलवाल यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकाला मारहाण करणे, त्याबरोबर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी बाबत विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयात जाण्यासाठी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची पोचपावती लागते. परंतु हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तक्रार मिळाल्याची पोच देण्यासाठी तयार नाहीत. कन्हैया खंडेलवाल यांचे बंधू किशोर खंडेलवाल दोन वेळेस पोलीस ठाण्यात गेले. मात्र त्यांना तक्रार मिळाल्याची पोच त्यावर सही शिक्का दिलेला नाही. त्यामुळे पोलिसांविरोधात न्यायालयात जायचे तरी कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद हे रुग्णालयात खंडेलवाल यांचा जबाब घेण्यासाठी आले असता, खंडेलवाल यांना यांनी दिलेली जशास तशी लेखी तक्रार डेमोक्रॅट महाराष्ट्रकडे उपलब्ध असून ती खालील प्रमाणे आहे.
काय आहे ॲक्शन टेकन इन गुड फेथ?
ॲक्शन टेकन इन गुड फेथ म्हणजेच एखाद्या लोकसेवकाने सदभावपूर्वक केलेले काम. लोकसेवकाकडून काम करीत असताना कायद्यामध्ये लोकसेवकाने काय करावे आणि काय करू नये याबाबत स्पष्ट तरतुदी नसतील आणि संबंधित अर्जदार, तक्रारदार किंवा पीडित व्यक्तीचे काही चांगली भले व्हावे, वाईट होऊ नये या उद्देशाने त्याने एखादी कृती केली असेल तर कायद्याने त्या कृतीला संरक्षण दिले जाईल. यालाच लोक सेवकांना मिळालेले ॲक्शन टेकन इन गुड फेथचे संरक्षण असे म्हणतात. परंतु या घटनेमध्ये खंडेलवाल यांना झालेली मारहाण कोणत्या सद्भावनेत बसते याचे उत्तर अद्याप पोलिसांकडून मिळालेले नाही.
Acting in good faith, or bona fide, as it is sometimes also referred to by the courts, refers to the concept of being sincere in one's business dealings and without a desire to defraud, deceive, take undo advantage, or in any way act maliciously towards others.